मोठी बातमी! तब्बल 60 हजार लाडके भाऊ वंचित ; पीएम किसान योजनेत मोठा बदल…

पुणे : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत केलेल्या बदलानंतर आता महायुती सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत देखील मोठा बदल केला आहे. याचा फटका आता तब्बल 60 हजार लाडक्या भावांना बसला आहे.केंद्र सरकार या योजनेत शेतकऱ्याला 6 हजारांचा हप्ता देते. आता या योजनेत एक बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, पती आणि पत्नीच्या नावावर शेती असेल तर केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी पतीला मानधन देण्यात येणार नसल्याचे समोर आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्याचा निकष लागू करण्यात आला आहे. त्याचा फटका राज्यातील 60 हजार शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांच्या बँक खात्यात योजनेचा 20 वा हप्ता जमा झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
कुटुंबात नवरा आणि बायको दोघांच्या नावावर शेती असल्याने दोन लाभार्थी असतील तर आता केवळ कुटुंबातील महिला लाभार्थ्यालाच पीएम किसानचे दोन हजार मिळतील. पुरुष लाभार्थ्याला दोन हजार मिळणार नाहीत, हा केंद्र सरकारचा फतवा अजबच म्हणावा लागेल, अशी टीका त्यांनी केली आहे.
एकीकडे जीएसटीमध्ये कपात करून दिंडोरा पिटायचा आणि दोनच दिवसात शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे हफ्ते बंद करायचे? केंद्र सरकारला हे शोभते का? असा हल्लाबोल पवार यांनी चढवला आहे.
