धक्कादायक! केडीएमसीच्या प्रसतीगृहात डॉक्टर- कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू, नातेवाईक संतापले….

मुंबई : कल्याण डोबिंवली महानगरपालिकेच्या प्रसुतीगृहात एका नवजात बाळाचा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाळाच्या नातेवाईकांनीं असा आरोप केला असून या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केडीएमसीच्या प्रसुतीगृहात आज (७ सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काल तसलीमा खातून नावाच्या महिलेला कल्याण डोबिंवली महापालिकेच्या वसंत व्हॅली प्रसुतीगृहामध्ये दाखल करण्यात आले होते. प्रसूतीनंतर त्यांना एक मुलगी झाली. मात्र बाळाला काही त्रास होत असल्याने त्याला ऑक्सिजनवर ठेवण्याचा सल्ला दिला पण दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.यावरुन बाळाच्या नातेवाईकांना गोंधळ घातला आणि बाळाचा मृत्यू हा केडीएमसीच्या रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला आहे.
बाळाच्या मृत्यूनंतर बाळाचे वडील अजरुद्दीन मनसुरी यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी कल्याण डोबिंवली महानगरपालिका प्रशासनाशी या घटनेसंदर्भात संपर्क केला. बाळाचा पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
