शिरूर तालुक्यात पाच वर्षाच्या बालिकेवर परप्रांतीयाकडून लैंगिक अत्याचार…

लोणी काळभोर : शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे एका पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घृणास्पद कृत्यामुळे परिसरांत खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फंटूसदास दिलीप मोची (सध्या रा. सणसवाडी, ता. शिरुर जि.पुणे,मूळ रा. गोपाळपूर, ता. चानन कुमादर, जि. लखीसराय, बिहार) या नराधमास अटक करण्यात आली आहे.
पिडीत मुलीची आई घरात काम करीत असताना, तिची पाच वर्षाची चिमुकली भावासमवेत घराबाहेर असलेल्या वाळूमध्ये खेळत होती. याचाच फायदा घेऊन शेजारी रहात असलेल्या फंटूसदास याने तिच्या भावाला पैसे देऊन चॉकलेट आणण्यासाठी दुकानात पाठविले. त्यानंतर यांचा मोका साधून नराधमाने चिमुकल्या बालिकेला नजीक असलेल्या एका खोलीमध्ये नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पिडीतेच्या आईने शिक्रापूर पोलिसांमध्ये फिर्याद दिली. यांवरून पोलिसांनी फंटूसदास याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय मस्कर हे करीत आहेत.
