धक्कादायक! खेळता खेळता अस्वस्थ वाटू लागलं, म्हणून आईकडे धावला.. अन आईच्या कुशीतच ‘श्रावण ‘बाळाने सोडलं प्राण

कोल्हापुर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावात बुधवारी रात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. १० वर्षीय असणाऱ्या श्रावण अजित गावडे या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे. त्याला खेळताना अस्वस्थ वाटत असल्यामुळे हा चिमुकला धावत धावत घरी आला. आईने त्याला जवळ घेतले असता या चिमुकल्याने आईच्या मांडीवर प्राण सोडले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आनंदनगर वसाहतीतील शिवनेरी गल्लीमध्ये राहणाऱ्या गावडे कुटुंबातील श्रावण मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपात खेळत होता. अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि खेळ सोडून तो घरी पळत आला. आईच्या कुशीत डोकं टेकत श्रावणने प्राण सोडले. आईच्या कुशीतच त्याने डोळे मिटले.श्रावणला त्याच्या कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात नेले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. श्रावणचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. श्रावणच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे कोडोलीतील आनंदनगर वसाहतीवर शोककळा पसरली आहे.
दरम्यान श्रावणच्या आईने आपल्या लेकरासाठी टाकलेला आर्त हंबरडा आणि मदतीसाठीची धडपड पाहून शेजारी धावून आले. श्रावणच्या आईचे रडून रडून बेहाल झाले . अखेर आपल्या आईच्या कुशीतच त्यांने आपला अखेरचा श्वास घेतला.श्रावण गावडे हा चौथीमध्ये शिकत होता. अभ्यासामध्ये तो खूप हुशार होता. आपल्या आई-वडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. या कुटुंबाने चार वर्षांपूर्वीच आपल्या लहान मुलीला गमावले होते आणि आता श्रावण ही अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
