मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे सरकार ॲक्शन मोडमध्ये, महत्वाच्या बैठका सुरू, आजच तोडगा निघणार? 


मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. आरक्षण मिळेपर्यंत उठणार नाही, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

तसेच काल उशिरा रात्री झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा महत्त्वाची चर्चा होणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महाधिवक्ता उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आज सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत ठोस प्रस्ताव पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यात आज सकाळी ११ वाजता वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे. यामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेत न्यायालयीन अडचणी, तसेच कायदेशीर मार्ग काढण्यासाठी आवश्यक सल्लामसलत केली जाणार आहे. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातही बैठक पार पडली होती.

दरम्यान, शिंदे साताऱ्यातून आणि अजित पवार पुण्यातून तातडीने मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत सरकारकडून काही ठोस निर्णय होण्याची शक्यता अधिक आहे.सरकारकडून होत असलेल्या हालचालींमुळे मनोज जरांगे पाटीलयांच्यापर्यंत आजच एखादा प्रस्ताव जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखवण्यास न्यायालयीन अडसर असल्याने त्यावर उपाययोजना कशी करावी, यावर सरकारदरबारी खलबतं सुरू आहेत. त्यामुळे आंदोलकांच्या अपेक्षा आजच्या बैठकीकडे लागल्या आहेत.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज वर्किंग-डे असल्यामुळे प्रत्येक कर्मचारी व नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे. आयकार्ड नसलेल्यांना मंत्रालय परिसरात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!