खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्या श्वेता कुऱ्हाडे यांच्यावर गंभीर आरोप! मुठा कालवा उपविभागाने केले मनमानी व सूडबुद्धीने कामकाज केल्याचे आरोप….

उरुळीकांचन : पुणे शहराला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या तसेच हवेली, दौंड व इंदापूर तालुक्याच्या शेतीच्या सिंचनासाठी पाणी पुरवठा तसेच खडकवासला धरण साखळीची सुरक्षिता, देखभाल – दुरुस्ती व नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या खडकवासला प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्या श्वेता कुऱ्हाडे यांच्यावर उपविभागातील मुठा कालवा विभागाचे संपूर्ण अधिकारी व कर्मचारी यांनी थेट नियमबाह्य व मनमानी कारभाराचा आरोप ठेऊन थेट मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांना निवेदन दिल्याने खळबळ उडाली आहे.

खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्यावर खडकवासला प्रकल्पाची मोठी जबाबदारी आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अविश्वास दाखल्याने कारभाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खडकवासला उपविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांची चौकशीची मागणी केली आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेल्या निवेदनात श्वेता कुऱ्हाडे मागील दोन वर्षापासून खडकवासला पाटबंधारे विभागामध्ये कार्यरत असून सदर कालावधीत वारंवार नियमबाह्य व मनमानी कारभार करून मुठा कालवे उपविभाग ,पुणे स्वारगेट अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेठिस धरत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांनी कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात श्वेता कुऱ्हाडे ह्या विभागात येणाऱ्या तीन मोठ्या धरणांत धरण सुरक्षा संदर्भात आवश्यक असलेल्या बाबींचा पाठपुरावा करण्यात टाळाटाळ करीत आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करीत आहे. मान्सूनपूर्व काळात धरणाचे नियमित देखभाल दुरुस्ती कामे पूर्ण न करणे, अत्यावश्यक मंजूर कामे कोणतेही सबळ कारणाशिवाय काम रद्द करणे, धरण द्वार परिचलना सारखे महात्वाचे कामा करिता मनुष्यबळ पुरवठा वेळेत न करुन पर्यायाने धरण सुरक्षा धोक्यात आणणे, खर्चाचा परतावा न देणे, सिंचन व बिगर सिंचन संस्थांना पाणी पुरवठा करताना जाणीवपुर्वक हलगर्जीपणा करणे, सूडबुद्धीने अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वागून नियमबाह्य पद्धतीने सेवा वर्ग करणे व नियमबाह्य पद्धतीने वेतन थांबवणे, पूर व्यवस्थापनात अडथळा करणे , धरण व्यवस्थापकांना धमकविणे, कामांच्या निविदा प्रक्रियांमध्ये नियमबाह्य पद्धतीने वर्तणूक करणे अशा गंभीर तक्रारींचा सामावेश निवेदनाद्वारे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांच्याकडे केला आहे. निवेदनात उपविभागीय अभियंता मोहन बदाणे, शाखाधिकारी, खडकवासला पाटबंधारे शाखा गिरीजा कल्याणकर, शाखाधिकारी वरसगाव धरण पाटबंधारे प्रतिक्षा रावण-मारके
शाखाधिकारीपानशेत धरण पाटबंधारे अनुराग मारके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वाक्षरी आहेत.
या संदर्भात खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांना संपर्क होऊ शकला नाही.
” श्वेता कुऱ्हाडे यांनी पदाची अहमियता समजून पदावर काम करणे आवश्यक आहे. परंतु त्यांच्याकडून प्रकल्पाच्या संबंधी आवश्यक निर्णय शीघ्रगतीने उचलणे क्रमप्राप्त असताना अपेक्षित निर्णय होत नसून त्यांच्या कार्यपद्धतीने गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. पदाचा वापर अधिकारवाणात होण्याऐवजी सूड उगविण्यात होत आहे”
— मोहन बदाणे, उपविभागीय अधिकारी खडकवासला उपविभाग.