शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला ; 22 तलाठ्यांसह 28 जणांवर गुन्हे दाखल,नेमकं प्रकरण काय?

जालना : जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या नैसर्गिक आपत्ती अनुदानात तब्बल 25 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 22 तलाठ्यांसह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सन 2022 ते 2024 या काळात जिल्ह्यात अतिवृष्टी, गारपीट आणि दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. शासनाने पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नैसर्गिक आपत्ती अनुदान जाहीर केले. मात्र, या अनुदानाचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांना न देता, बोगस लाभार्थ्यांच्या नावावर वळवून अधिकाऱ्यांनी अपरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.त्यांनी संगणक प्रणालीचा गैरवापर करून बोगस नावे दाखल करणे, खोटी कागदपत्रे सादर करणे आणि बनावट एन्ट्रीज करणे अशा प्रकारे सुमारे 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांची बेकायदेशीर वळवणूक केली आहे.या प्रकरणी 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात २२ तलाठ्यांचा समावेश आहे. तलाठ्यांव्यतिरिक्त इतर शासकीय कर्मचाऱ्यांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घोटाळ्याची गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अंबड येथील सहायक महसूल अधिकारी विलास मल्हारी कोमटवार यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 453 /2025 नुसार गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अमोल गुरले करत आहेत.
