धक्कादायक ; पुण्यातील नवले पुलाजवळ मध्यरात्री बसने अचानक पेट घेतला अन…

पुणे : पुण्यात अपघातामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या नवले पुलाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे.मध्यरात्री खाजगी बस महामार्गावरून जात असताना बसने अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाली आहे. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगळुरू महामार्गावरून जाताना नन्हे येथील श्री स्वामी नारायण मंदिराजवळ चालत्या बसमधून अचानक धूर आल्याने चालकाने तातडीने बसमध्ये झोपेत असलेल्या सर्व प्रवाशांना जागे केले. सर्व त्वरित बाहेर पडले अन् बसने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी त्वरित पोहोचून जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली
दरम्यान चालकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आगीने पेट घेतल्याने बसचे मोठे नुकसान झाले आहे.आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
