लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सून योजना! एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, काय आहे नवी योजना? जाणून घ्या संपूर्ण माहिती..

मुंबई : राज्यात ‘लाडकी बहीण योजने’च्या यशानंतर आता ‘लाडकी सून योजना’ सुरू करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच ठाण्यात या योजनेचा भव्य शुभारंभ करण्यात आला.
ज्या सुनांचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक किंवा मानसिक अत्याचार होतात, त्यांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एक हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी नुकतंच ठाण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदेंनी लाडकी सून योजना सुरु करत असल्याचे जाहीर केले. ज्याप्रकारे घरांमध्ये लाडकी मुलगी असते पण लाडकी सून मात्र नसते, अशा विचारधारेला छेद देऊन प्रत्येक सून ही लाडकीच असली पाहिजे, या उद्देशाने शिवसेनेकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे.
यामध्ये केवळ पीडित सुनांनाच नाही, तर चांगल्या सासूंचाही सन्मान केला जाणार आहे, जेणेकरून समाजात एक सकारात्मक संदेश जाईल. या मोहिमेअंतर्गत, घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी एक विशेष हेल्पलाइन नंबर देण्यात आला आहे. 8828862288 असा हा हेल्पलाईन नंबर असणार आहे. या मोहिमेत शिवसेना शाखा आणि कार्यालयेही सहभागी होणार आहे.
तसेच पीडित महिलांना तातडीने मदत पुरवली जाईल. यावेळी एकनाथ शिंदेंनी या योजनेबद्दल आपले मत व्यक्त केले. जशी आपली मुलगी असते, तशीच सूनही असते. तिलाही सन्मानाने वागवले पाहिजे. अनेक घरांमध्ये सुनांवर अत्याचार होतात, त्यांना त्रास दिला जातो. याला आळा घालण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे. ज्या सुनांना मदत हवी असेल, त्यांनी न घाबरता या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. असे आवाहन एकनाथ शिंदेंनी केले.
सुरुवातीला समुपदेशनाद्वारे कुटुंबामध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर ही पद्धत अयशस्वी ठरली, तर मग आपली शिवसेना स्टाईल आहेच. या योजनेत केवळ अन्याय झालेल्या सुनांनाच नाही, तर चांगल्या सासूंचाही सन्मान केला जाणार आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, राज्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे या योजनेची राज्यस्तरावरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही मोहीम राज्यभर राबवली जाणार असून, प्रत्येक शिवसेना शाखेतून पीडित महिलांना मदत केली जाईल.