राहुल गांधींच्या ‘मतचोरी ‘ च्या आरोपांना निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर ; आयुक्त स्पष्टच म्हणाले….

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून निवडणूक आयोगाची भूमिका आणि मतदान प्रक्रियेवर गंभीर आरोप केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तर थेट पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांत मतचोरी होत असल्याचे पुरावेच सादर केले होते. निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपाला आता निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिल आहे.मतचोरी सारख्या चुकीच्या शब्दाचा वापर केला जात आहे. जनतेला भ्रमित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे. हा भारतीय संविधानाचा अपमान नाही तर काय आहे? असा सवाल निवडणूक आयोगाने केला आहे.
निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केले जात आहे. पण खोट्या आरोपांमुळे निवडणूक आयोग घाबरणार नाही. निवडणूक आयोग भारतातील सर्व मतदारांसोबत आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक आयोगासाठी सर्व राजकीय पक्ष समान आहेत.कायद्यानुसार निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यानंतर प्रत्येक पक्षाचा जन्म होतो. त्यामुळे निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव कसा करू शकतो. निवडणूक आयोगासाठी कोणीही सत्ताधारी किंवा कोणीही विरोधी पक्ष नाही. आमच्यासाठी सर्वजण समान आहेत, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसापासून विरोधकांकडून निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले असताना आता निवडणूक आयोगानेही थेट पत्रकार परिषद घेऊन सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. निवडणूक आयोगाने मतचोरीच्या आरोपांवर ही स्पष्टीकरण दिल आहे.