राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार! १६ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट, जाणून घ्या..


पुणे : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे बाहेर पडताना काळजी घ्यावी लागणार आहे. हवामान विभागाने १३ ऑगस्ट रोजी राज्यातील १६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे, तर पालघरमध्येही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

तसेच दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात, असेही सांगण्यात आले आहे. मुंबईत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा गडगडाटासह पाऊस पडू शकतो. गेल्या काही दिवसांपासून शांत झालेला पाऊस पुन्हा एकदा सुरु झाला आहे. हवामान अंदाजानुसार पुण्यात आज साधारणतः ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

तसेच शेजारी असलेला सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यामुळे लोकांना गरज असल्याशिवाय बाहेर पडू नये आणि काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर जिल्ह्यांमध्ये साधारणतः ढगाळ वातावरण राहील, असेही सांगण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!