‘त्या’ मुलींवर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आमदार रोहित पवार रात्रभर कोथरूडच्या पोलीस ठाण्यात, नेमकं प्रकरण काय?

पुणे : पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली त्यांची अंतर्वस्त्रे तपासण्यात आली तुम्ही रांडा आहात लेसबियन आहात असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ देखील केली. हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, छत्रपती संभाजीनगर मधील एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून या तीन मुलींकडे एक दिवसासाठी राहायला आली होती. इथून या अन्यायकारक गोष्टीची सुरुवात झाली. या मुलीची बेपत्ता होण्याची खबर पोलीस ठाण्यात नोंदण्यात आली त्यावरून पोलिसांनी तिचा मोबाईल ट्रॅक केला तेव्हा तिचे लोकेशन कोथरूडमध्ये आढळले. पोलिसांनी रात्रीच कोथरूड गाठले आणि संबंधित तीन मुलीच्या फ्लॅटवर जाऊन चौकशी केली.
त्या मुलींना ताब्यात घेतले आणि कोथरूड पोलीस ठाण्यात नेले तेथे रिमांड रूम मध्ये या तिन्ही मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केला हा आरोप सध्या पोलिसांवर आहे. फौजदार प्रेमा पाटील आणि फौजदार अमोल कामठे महिला कर्मचारी संजीवनी शिंदे या तिघांवर हा आरोप आहे त्यावरून काल दिवसभर सामाजिक कार्यकर्त्यास श्वेता पाटील यांच्यासह हे कार्यकर्ते पोलीस आयुक्तालय समोर ठाण मांडून होते.

त्यानंतर आमदार रोहित पवार यांची एन्ट्री झाली आणि हे प्रकरण आणखीच चर्चेत आले आणि गंभीरही बनले. आता हे प्रकरण नेमकं काय आहे? तर या मुलीचा सासरी छळ होत होता. म्हणून ती संभाजीनगर मधून निघून पुण्यात आली.

सासरच्या लोकांच्या विरोधात रीतसर तक्रार नोंदवली आणि महिला आश्रमात दाखल होण्याच्या अगोदर एका रात्रीसाठी या मुलींना तिने विचारणा केली. त्यांच्या खोलीवर राहण्याची तिने परवानगी मागितली. या मुलींनी तिला खोलीवर घेतले. एक रात्र त्या ठिकाणी ती राहिली आणि तेथून ती सकाळी निघून गेली.
पण खरा मुद्दा इथून सुरू झाला, कारण या मुलीचे सासरे मराठवाड्यातील माजी पोलीस अधिकारी आहेत. त्यांचा इगो दुखावला. कारण ते राज्यातील राजकारणातील अनेक नेत्यांची जवळचे आहेत. मग त्यांनी आपली ताकद वापरली आणि पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन मराठवाड्यातून तडक कोथरूडमध्ये पोहोचले.
त्या तीन मुलींच्या फ्लॅटवर पोहोचले. धाड टाकली. मोबाईल तपासले. खोलीतील कपडे, अंतर्वस्त्रे साऱ्यांची तपासणी केली. कोणतेही सर्च वॉरंट नसताना बेकादेशीरपणे त्या मुलींना कोथरूड पोलीस ठाण्यात आणले. एक मुलगी नोकरी करते तिला नोकरीच्या ठिकाणाहून आणण्यात आले. पाच तास सीसीटीव्ही कॅमेरा नाही अशा ठिकाणी त्यांना बसवले आणि त्यांचा कबूली जबाब घेतला. पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेताना जे शब्द वापरले त्यामुळे घरमालकानेही या मुलींना घर खाली करण्याची सूचना केली.
अर्थात या मुलींचा आरोप आहे की पोलिसांनी त्यांच्याशी भयानक गैरवर्तन केले. तुम्ही कुणाबरोबरही झोपत असाल. तुमच्या रूमवर मुले येत असतील. तुम्ही रांडा आहात. तुम्ही लेस्बिअन आहात म्हणून असे वागतात. एका मुलीला तर तुझ्या आई-वडिलांनी तुला टाकून दिले म्हणून तू अशी वागतेस तुझ्या एक दिवस कोणीतरी मर्डर करेल तू नीट जगू शकणार नाहीस तुला करिअरमध्ये कधीतरी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल ते आम्ही देणार नाही तुझं करिअर बरबाद होईल असं म्हणत या मुलींना धमकवण्यात आले.