केसनंद येथे जमिनीच्या वादातून गोळीबार, एक जण गंभीर जखमी, घटनेने खळबळ..

हवेली : पुण्यात जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. हवेली तालुक्यातील केसनंद येथे एका व्यक्तीवर गावठी पिस्तुलाने गोळीबार केल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी (ता.३१) रात्री ९:३० च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सुशील ढोरे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोक्का गुन्ह्यातील जामिनावर सुटलेला आरोपी सचिन राजाराम ढोरे व त्याचे साथीदार भिवराज हरगुडे आणि गणेश जाधव या तिघांनी मिळून हा हल्ला केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, जमिनीच्या वादातून हवेली तालुक्यातील केसनंद येथे एका व्यक्तीवर गावठी पिस्तुलाने गोळीबार करण्यात आला असून हल्ल्यात सुशील ढोरे यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी सचिन ढोरे आणि भिवराज हरगुडे यांना अटक केली आहे.
दरम्यान, तिसरा आरोपी गणेश जाधव हा अद्याप फरार आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे पुढील तपास करत आहेत.