यवत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना प्रकरण! पोलिसांनी दोन जणांना घेतले ताब्यात..

दौंड : दौंड तालुक्यातील यवत या याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली. याप्रकणी यवत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

अमित पापा सय्यद (वय ३२ वर्षे रा. यवत, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी अमित सय्यद हा निळकंठेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका गावठी दारूच्या अड्ड्यावर दारू पिऊन तो निळकंठेश्वर मंदिरात असलेल्या बाकड्यावर झोपला होता. त्यानंतर आरोपीने दारूच्या नशेत मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची तोडफोड करून तो फरारी झाला होता. मात्र आरोपीचा मोबाईल आणि चप्पल घटनास्थळी राहिली होती.

आरोपी पुन्हा सकाळी रेड्डी कावरा गुडावत याच्या दारूच्या अड्ड्यावर आला असता गुडावत याने आरोपीची माहिती पोलिसांना न देता आरोपीला पळून जाण्यास सांगितल्यामुळे यवत पोलिसांनी रेड्डी कावरा गुडावत याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्यालाही अटक केली आहे.

आरोपी अमित सय्यद हा तो राहत असलेल्या घराच्या पाठीमागील ऊसाच्या शेतात ऊस खाऊन आणि ओढ्याचे पाणी पिऊन लपून बसला होता. बुधवारी रात्री ऊसाच्या बाहेर आला असता पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. दोन्ही आरोपींना दौंड न्यायालयापुढे सादर करण्यात येणार आहे.