एकनाथ शिंदेंना दणका ; ‘या’ खात्याच्या कामांना मंजूरी देण्याआधी मुख्यमंत्र्यांची मान्यता असणार बंधनकारक

पुणे : महायुती सरकारमधील तिन्ही पक्षामध्ये असणारा अंतर्गत वाद आणि काहीशी नाराजी असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार आता नगर विकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधी वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक असणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसला आहे.

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केला जात आहे. मात्र या निधीवाटपामध्ये गरज, प्रस्ताव सादरीकरण आणि सुसंगततेची तपासणी न करता अनेक पालिकांना मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निधीवाटपावर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्याचे नियंत्रण मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्याकडे घेतलं आहे. त्यामुळे यापुढे नगरविकास विभागामार्फत कोणत्याही योजनेंतर्गत कामांना मंजुरी देण्याआधी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे निधीवाटपाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि नियोजनशीलता सुनिश्चित होणार आहे.
