मंचरच्या स्मशानभूमीत पुन्हा जादूटोणा, अंत्यविधीच्या ठिकाणी गुलाल अन्….; धक्कादायक प्रकार आला समोर

मंचर : येथील तपनेश्वर स्मशानभूमीत पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी अज्ञात व्यक्तीने अंत्यविधी झालेल्या जागेवर गुलाल उधळत, रिंगण घालत आणि हळदी-कुंकवाने पूजा करून अघोरी विधी केला आहे. काही दिवसांपूर्वी देखील असाच प्रकार समोर आला होता.
ही घटना घडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वीजपुरवठा जानूनबुजून बंद करण्यात आला होता. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी एक सावडण्याचा कार्यक्रम ठरला होता. याच दिवशी सकाळी लोकं स्मशानभूमीत गेले असता त्यांनी चितेवर काहीतरी जळत असल्याचे व गुलाल उधळून केलेल्या रिंगणासह पूजा विधीचे अवशेष दिसले.
यावेळी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कॅमेऱ्याचा वीजपुरवठा बंद केल्याचे दिसून आले. एक अज्ञात व्यक्ती स्मशानात आला आणि गुलाल उधळत जादूटोण्याचा प्रकार करत होता. असे एकाने सांगितले आहे.
या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून मंचर पोलीस आणि नगरपंचायतीने तत्काळ आरोपीचा शोध घ्यावा, अन्यथा स्मशानभूमीत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.