दौंडमध्ये खळबळ!! पाटस तलावात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह; दोन्ही पाय तारेने बांधलेले अन्…

दौंड : तालुक्यातील पाटस गावातील तलावात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृत तरुणाचे दोन्ही पाय तारेने घट्ट बांधलेले असल्याचे आढळून आले असून, त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून पोलीस तपास करत आहेत.

काही स्थानिक नागरिकांनी यवत पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह तलावातून बाहेर काढून पंचनामा केला असून तपास सुरु केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणात घातपाताचा संशय गडद होत असून, अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची पाहणी करण्यात आली. यामध्ये प्राथमिक तपासात मृत तरुणाच्या पायांना तार बांधलेली स्पष्ट दिसून आली आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू आहे.

या घटनेमुळे गावात चर्चा सुरु झाली असून याबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यवत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिसिंग केसचा तपास देखील पोलीस करत आहेत. या घटनेमुळे सगळेच हादरले असून पोळी सध्या याबाबत चौकशी करत असून सीसीटीव्ही तपासले जात आहेत.