हवेलीचे आम्हीच सिकंदर; पुणे बाजार समितीच्या सभापती प्रकाश जगताप बिनविरोध….

जयदिप जाधव

उरुळीकांचन : पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या पुणे (हवेली ) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रकाश चंद्रकांत जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्रकाश जगताप यांच्या निवडीने त्यांनी एकेकाळी स्वकीय असलेल्या सहकाऱ्यांसह हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रावर अनेक वर्षे मांड ठेऊन असलेल्या नेत्यांना धोबीपछाड डाव देऊन टाकल्याची चर्चा तालुक्यात आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तालुक्यातून सभापतीपदासाठी कोणाची वर्णी लागणार म्हणून तालुक्यातून चर्चेचा धुराळा उडविण्यात आला होता. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत हे पद मिळावे म्हणून तालुक्यात पळापळ सुरू होती.मात्रअखेर संचालक मंडळातील विद्यमान १२ संचालकांनी प्रकाश जगताप यांच्या मागे ठोस भूमिका घेऊन त्यांना सभापती करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आज शुक्रवार (दि.१८ ) रोजी जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत प्रकाश जगताप यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती २३ वर्षे प्रशासकीय राजवटीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया व सत्ताधारी भाजपच्या वरिष्ठनेत्यांच्या माध्यमातून प्रादेशिक, पुणे जिल्हा रचना झाल्यानंतर हवेली तालुक्याच्या कार्यक्षेत्रात आणून निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी प्रकाश जगताप यांनी मुख्य भूमिका बजावली आहे. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी दौंड चे आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद, विकास दांगट यांच्या अधिपत्याखाली राष्ट्रवादी (अजित पवार ) गट, भाजप गट यांच्या सोबतीने या बाजार समितीवर सर्वपक्षीय पॅनेलची रचना करून सत्ता हस्तगत केली आहे. मात्र त्यानंतर झालेल्या सभापतीपदाच्या बेबनावात पुढील सभापती हा सर्वपक्षीय नेते निवडीचा की भाजप म्हणून तालुक्यात जोर धरला होता. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळी या निवड प्रक्रियेत जगताप यांच्या उमेदवारीला समर्थन दिल्याची चर्चा आहे.
दोघा भावांची तालुक्यात मोठी धास्ती!
पुणे बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी दोन सख्खे भाऊ कारभार सांभाळणार म्हणून बाजार समितीच्या निवड प्रक्रिये आधीच तालुक्यात विरोधकांकडून मोठा गदारोळ सुरू करण्यात आला होता. तालुक्यात दोन सख्खे भाऊ दोन महत्वाचा संस्थांवर कशासाठी हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र हा सर्व कडवट विरोध मोडीत काढीत जगताप यांनी आपण सहकाराचे सिकंदर असल्याचे दाखवून दिले आहे.
यशवंत कारखान्याला जमीन खरेदीला बळ!
पुणे बाजार समितीच्या माध्यमातून यशवंत कारखान्याची जमीन खरेदी करून तालुक्यातील सहकारी संस्थेला नवसंजीवनी देण्याचा पहिला प्रयत्न सभापती प्रकाश जगताप यांनी मांडला होता. या निर्णयाला बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळानी ठराव मंजूर करून पाठिंबा दिला आहे. राज्य शासनाकडून या जमिन विक्री प्रस्तावाला पणन विभागाच्या मंजुरी प्रतिक्षेत आहे. या प्रस्तावाला उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सभापती कसे मार्ग काढणार म्हणून तालुक्याला अपेक्षा असणार आहे.
खरेदी विक्री संघाला निवडणुकीचा किनार लागणार?
पुणे बाजार समिती प्रमाणे हवेली तालुका खरेदी विक्री संघाची कायदेशीर निवडणूक प्रक्रिया पार पडावी म्हणून सभापती प्रकाश जगताप यांच्या समर्थकांनी जिल्हा सहकार उपनिबंधक यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. या तक्रारीमुळे हवेली तालुक्यात ५० वर्षे झाली नाही ती निवडणूक होण्याची कार्यवाही अटळ झाली आहे. बाजार समिती,यशवंत कारखान्याप्रमाणे खरेदी संघाची निवडणूक जगताप बंधूच्या भोवती फिरणार म्हणून चर्चा सुरू झाली आहे.