करेंगे दंगे चारो ओर…!! विधानभवनातल्या राड्यानंतर कुणाल कामराचा सरकारवर निशाणा, नेमकं काय म्हणाला?

मुंबई : राज्यातील विधानभवनात झालेल्या धक्कादायक हाणामारीच्या घटनेनंतर आता प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महायुती सरकारवर उपरोधिक हल्ला चढवला आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी संध्याकाळी भिडले. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली आणि त्यात एकमेकांचे कपडेही फाडण्यात आले.
तसेच या घटनेवरून आता कॉमेडियन कुणाल कामराने सरकारला डिवचलं आहे. हाणामारीच्या व्हिडीओवर उपरोधिक कविता करत त्याने निशाणा साधला आहे. होंगे नंगे चारो ओर, करेंगे दंगे चारो ओर…, अशा उपरोधिक कवितेच्या माध्यमातून कामराने हाणामारी करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

‘होंगे नंगे चारो ओर, करेंगे दंगे चारो ओर..’ अशा शब्दांत त्याने महायुती सरकारवर टीका केली आहे. हाणामारीच्या घटनेचा व्हिडीओ एडिट करून त्यावर कुणालने त्याची ही उपरोधिक कविता सादर केली आहे. ‘कायदा मोडणारे’ असं कॅप्शन देत कुणालने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

*Lawbreakers* pic.twitter.com/L8aiwvGlPw
— Kunal Kamra (@kunalkamra88) July 17, 2025
दरम्यान, त्यात पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडताना दिसत आहेत. त्यानंतर पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही झलक पहायला मिळते.
अशी कविता त्याने या व्हिडीओला जोडली आहे. त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या असून त्याच अहवाल आल्यावर हाणामारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. ही घटना अतिशय चुकीची आहे. विधान भवनाचा परिसर विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या अखत्यारित येत असून त्यांनी याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.