राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदाराच्या अडचणी वाढणार ; पक्षातील नेत्यामुळे येणार गोत्यात

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावल्याने त्यांच्या अडचणी आणखीनच वाढणार आहेत. जानकर यांच्या जात प्रमाणपत्राबाबत संकल्प डोळस यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने जानकर यांना नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे जानकर यांची आमदारकी धोक्यात येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उत्तम जानकर हे माळशिरस राखीव मतदार संघातून हिंदू खाटीक या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवून विजयी झाले होते. माजी आमदार हणमंत डोळस यांचे पुत्र संकल्प डोळस यांनी उच्च न्यायालयात जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यानीं दाखल केलेल्या याचिकेवर आता मुंबई उच्च न्यायालयाने जानकर यांना नोटीस बजावली आहे. संकल्प डोळस हे देखील राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये काम करीत असले तरी उत्तम जानकर आणि त्यांच्यात संघर्ष आहे. येत्या 30 जुलै रोजी याची सुनावणी होणार असून याची नोटीस मुंबई उच्च न्यायालयाने आमदार जानकर यांना दिली आहे. या नोटीसवर जानकर काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
माळशिरस राखीव मतदार संघातून उत्तम जानकर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढले होते. त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांचा थोडक्या मतात पराभव केला होता आणि जानकर विजयी झाले होते. यानंतर ईव्हीएममशीनवर संशय घेत जानकर यांनी मारकडवाडी येथून सुरू केलेले आंदोलन देशपातळीला पोहचले होते.
