मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, डोक्यावर ओतली शाई, अक्कलकोटमध्ये राडा…

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली.

येथील शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांकडून हे काळं फासण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ही घटना घडली.
शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं असल्याचं बोललं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट दौऱ्यावर होते. यावेळी ते फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आले होते.

दरम्यान, तिथे येताच काही लोक अचानकपणे त्यांच्याकडे आले आणि जमा होत त्यांनी प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं. काळं फासणारे लोक हे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचादेखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणदेखील केले होते.
दरम्यान, प्रवीण गायकवाड यांचा आज अक्कलकोटमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र, या सत्कार समारंभाच्या ठिकाणीच त्यांना काळं फासण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान, इंदापूरच्या शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याची माहिती असून पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.