पुण्यात पावसाचा धुमाकूळ! दिवेघाटात धबधब्यांचे रौद्र रूप, पिंपरीत वाहने वाहून गेली, पुणे जलमय..

पुणे : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुण्यात मोठा धुमाकूळ घातला आहे. यामुळे सगळं पुणे जलमय झाले आहे. यामध्ये दिवेघाटात धबधब्यांचे रौद्र रूप घेतले असून पिंपरीत वाहने वाहून गेली आहेत. याबाबतचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने थैमान घातले.
दिवे घाट परिसरात ढगफुटी झाल्याने धबधबे रौद्र रूपात वाहताना दिसले. घाटातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली उतरल्याने सखल भाग जलमय झाले. हिंजवडी आयटी पार्क परिसरात देखील मुसळधार पावसाचा फटका बसला. तासाभरात झालेल्या पावसाने रस्ते नद्यांमध्ये रूपांतरित झाले. गुडघाभर पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
तसेच अनेक दुचाकी, चारचाकी वाहने पाण्यात अडकली. गेल्या आठवड्यात नालेसफाई करण्यात आली असली तरी पुन्हा एकदा पाणी साचल्यामुळे प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पावसाळ्यापूर्वीच्या कामात सुधारणा आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक वाहने पाण्यात अडकली, तर काही ठिकाणी पाण्याची पातळी गुडघ्यापर्यंत पोहोचली.
अनेक भागांमध्ये पाणी साचले असून, आयबी गेस्ट हाऊससारख्या शासकीय इमारतीतही पाणी शिरले. गेस्ट हाऊसमध्ये आमदार, माजी आमदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वास्तव्याची सोय असून, जिन्यापर्यंत पाणी साचल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे शहरात मोठी गैरसोय बघायला मिळाली आहे. याबाबत काम करण्याची मागणी होत आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये चऱ्होलीतील ओढा ओसंडून वाहत गेल्याने चार ते पाच वाहने प्रवाहात वाहून गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने क्रेनच्या सहाय्याने वाहने बाहेर काढली. सोशल मीडियावर याचे फोटो विडिओ सध्या व्हायरल होत असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.