दोन्ही कार्यकर्त्यांच ठरलं! आता नेत्यांचे कधी ठरणार? राज-उद्धव एकत्र येण्यापूर्वी सर्वात मोठी घडामोड…

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहेत. अनेकांनी यावर असे झाले तर चांगलेच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. असे असतानाच तिकडे नाशकात दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलनही झाल्याचे दिसून आलं.

नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावल्याचं दिसून आलं. शिवसेना ठाकरेंच्या जिल्हाप्रमुख डी.जी.सूर्यवंशींसह अनेक पदाधिकारी मनसे कार्यालयात उपस्थित राहिले. यामुळे आता नेते कधी निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घ्यावा असे अमित ठाकरे यांनी सांगितले होते. डोंबिवलीनंतर नाशकातही दोन्ही ठाकेरेंचे कार्यकर्ते मनाने एकत्र आले. नाशिक मनसेने त्यांच्या कार्यालयाचे नूतनीकरण केल्यानंतर त्या ठिकाणी वास्तूशांती पूजेचे आयोजन केले होते.

त्या पूजेला ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होताना दिसत आहे. यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येणे ही महाराष्ट्राची गरज असल्याचं मतही या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं.
मराठी माणसाच्या हितासाठी या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे हीच सर्वसामान्य माणसाची आणि कार्यकर्त्याची भावना असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्र राज्यात मोठी ताकद निर्माण करू शकतात.