पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्समध्ये कोटींच्या सोन्याची चोरी, कर्मचारी हळूहळू वस्तू लंपास करत राहिला अन्…

पुणे : पुण्यातील प्रतिष्ठित ‘निळकंठ ज्वेलर्स’ या सराफी पेढीला तब्बल ४ कोटी ५८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चोरीचा सूत्रधार दुकानात कामाला असलेला सेल्समनच निघाला असून, विश्रामबाग पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
तसेच या घटनेमुळे सराफी व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, दुकानांमधील अंतर्गत सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी नितीन इरप्पा डांगे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रतिक नगरकर नावाच्या सेल्समनला अटक केली आहे. प्रतिक नगरकर हा गेल्या दोन महिन्यांपासून सराफी दुकानातील अंगठी, कॉइन, वेडणी अशा विविध प्रकारच्या सोन्याच्या वस्तू चोरत होता. चोरलेल्या सोन्याची एकूण किंमत ४ कोटी ५८ लाख १३ हजार ६७९ रुपये इतकी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक नगरकर हा नीळकंठ ज्वेलर्समध्ये सेल्समन म्हणून कामाला होता. त्याच्याकडे सराफी पेढीमधील अंगठी, कॉइन आणि वेडणी या काउंटरची जबाबदारी होती.
दररोज, तो तिथल्या दागिन्यांचे लेबल काढून ठेवत होता आणि त्यांची विक्री झाल्यानंतर शिल्लक वस्तूंची नोंद करताना, चोरून नेलेल्या वस्तूंचाही शिल्लक वस्तूंच्या यादीत समावेश करत होता. यामुळे दुकानात हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही, कारण तो मोठ्या चलाखीने हे कृत्य करत होता.