छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी पृथ्वीराज जाचक यांची बिनविरोध निवड, सभासदांचा एकच जल्लोष…

भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरच्या चेअरमन पदी पृथ्वीराज जाचक यांची एकमताने निवड करण्यात आली. कारखान्याची सगळी सूत्रे पृथ्वीराज बापू यांच्या हातात देणार असल्याचे अगोदरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.

त्यानुसार ही निवड करण्यात आली आहे. तसेच व्हा. चेअरमनपदी कैलास गावडे यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे सभासदांच्या मनातला नेता चेअरमन झाल्याने सभासदांनी एकच जल्लोष केला. येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तब्बल दहा वर्षांनी पार पडली. यामध्ये अजित पवार आणि पृथ्वीराज बापू यांनी एकत्र येत पॅनल तयार केला.
यावेळी सभासदांनी देखील भरभरून प्रतिसाद देत सर्वच्या सर्व 21 जागा निवडून दिल्या. कारखाना गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आहे. हा कारखाना फक्त पृथ्वीराज जाचक हेच अडचणीतून बाहेर काढतील असा विश्वास सभासदांमध्ये आहे.

यामुळे आता जाचक हेच चेअरमन झाल्याने सभासदांमध्ये नवचैतन्याचे वातावरण असून आता चांगला बाजारभाव तसेच इतर सोयी योग्य पद्धतीने मिळेल. कारखान्याचा कारभार देखील योग्य पद्धतीने चालेल, असा सभासदांना विश्वास आहे.
आज या निवडीअगोदर सर्व संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री यावेळी दत्तामामा भरणे तसेच इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील एकच जल्लोष केला.