महिलेला तलवारीचा धाक दाखवून घरफोडी, १३ लाखांचा ऐवज लंपास, कुंजीरवाडीतील घटना….


लोणी काळभोर : येथील कुंजीरवाडी ता. हवेली ग्रामपंचायत हद्दीतील आंबेकर मळा परिसरात शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घरफोडी करण्यात आली आहे. याठिकाणी तलवारीचा धाक दाखवून चोरट्यांनी महिलेच्या घरातील रोख रकमेसह 13 लाखांहून अधिक रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमल विशंबर डोईफोडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कमल यांचे पती विशंबर डोईफोडे हे व्यावसायाने वकील आहेत. विशंबर हे मुंबईत वकिलीची प्रॅक्टीस करतात. त्यामुळे फिर्यादी कमल व विशंबर हे सध्या मुंबईत राहतात. डोईफोडे कुटुंब हे शेती पाहण्यासाठी आल्यानंतर या बंगल्यावर राहत होते.

पावणे दोन वाजण्याच्या सुमारास चार चोरटे बंगल्याच्या पाठीमागील गेटमधून बंगल्यात घुसले. चोरट्यांनी देवघराच्या खिडकीचे लोखंडी ग्रील कट केले आणि घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील भिंतीवर लावलेली तलवार घेतली. त्यानंतर बेडरूममध्ये झोपलेल्या दोघींकडे गेले.

तेव्हा चोरट्यांनी फिर्यादी यांना तलवारीचा धाक दाखविला. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चोरट्यांनी फिर्यादी यांना उलट्या बाजूने हातावर आणि पाठीवर तलवार मारली. महिलेने भीतीने कपाटाकडे बोट दाखविले. चोरट्यांनी महिलेच्या अंगावरील आणि कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख 5 हजार रक्कम चोरून नेली.

चोरट्यांनी या घरफोडीत मंगळसूत्र, पाटल्या, मोहनमाळ, अंगठी, कर्णफुले असे 15 तोळे सोने चोरून नेले. त्याची 13 लाखांहून अधिक किंमत होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुराधा उदमले, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, उदय काळभोर हे घटनास्थळी दाखल झाले होते.

याबाबत पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून तीन पथके तयार करण्यात आली आहे. पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे करीत आहेत. या घटनेने मात्र एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!