वैष्णवी हगवणे ताजे असताना आणखी एक घटना; हुंडा न दिल्याने सासरी छळ, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, हडपसर येथील घटना..

पुणे : पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच लग्नात मनासारखा हुंडा न दिल्याने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आणखी एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुणे शहरातील हडपसर परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे.

देवकी प्रसाद पुजारी (वय.२२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून याबाबत दीपाचे वडिल गुरुसंगप्पा म्यागेरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, दीर प्रसन्ना चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा चंद्रकांत पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 18 एप्रिल रोजी विजयपूर येथील बागेवाडीतील बसव मंगल कार्यालयात दीपा व प्रसाद यांचा विवाह झाला. लग्न सोहळ्यात दीपाच्या घरच्यांनी हुंडा म्हणून प्रसादला 4 तोळे सोने दिले, यासह मानपानाप्रमाणे 10 लाख रुपये खर्च करुन लग्न करुन दिले. मात्र, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दीपा पुण्यात आली. त्याच दिवसापासून प्रसाद व त्याची आई सुरेखाने लग्नात भांडी, फ्रीज दिले नाहीत, यासह मानपान केला नाही म्हणून वाद घालून तिला शिवीगाळ केली.

दीपाने तिच्या वडिलांना ही हकीगत सांगून माहेर गाठलं. परंतु, त्यानंतर दीपाच्या सासऱ्याने तिची समजूत घातली आणि तिला पुन्हा पुण्यात आणलं. 18 मे रोजी दीपाने वडिलांना फोन केला व ती रडू लागली आणि लग्नात भांडी सामान दिले नाही म्हणून प्रसाद, दीर, सासू आणि सासरे शिवीगाळ करुन मारहाण करत असल्याचे वडिलांना सांगितले.

दरम्यान, त्यानंतर दीपाच्या वडिलांनी मी पुण्यात येतो व वाद सोडवितो, असे सांगून तिची तात्पुरती समजूत काढली. पण, 19 मे रोजी दीपा हिने हडपसर मध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल असून हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत.