धक्कादायक! कामावर निघालेल्या महिलेला ओढून नेत अत्याचार, घटनेने पुणे हादरले…

पुणे : कंपनीत कामाला निघालेल्या एका २७ वर्षीय महिलेला एका नराधमाने जबरदस्तीने ओढून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे, तर आरोपीने तिला मारहाणही केली आणि या घटनेबद्दल वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेने हिंमत दाखवत आपल्यावरील अत्याचाराची तक्रार चाकण पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. प्रकाश भांगरे असे या नराधमाचे नाव आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला आणि त्याला बेड्या ठोकण्यात यश मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना १३ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजता घडली. पीडित महिला चाकणमधील एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करते. ती नेहमीप्रमाणे रात्रपाळीच्या ड्युटीसाठी जात असताना मेदनकरवाडी येथील कंपनीजवळ पोहोचली होती.

त्याचवेळी प्रकाश भांगरे याने तिला जबरदस्तीने जवळच्या शाळेच्या मागील बाजूस ओढून नेले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला, तिला मारहाण केली आणि घडलेल्या घटनेबद्दल कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

परंतु, पीडित महिलेने हार न मानता आरोपीचा प्रतिकार केला आणि त्याला चावाही घेतला. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. पीडितेने मदतीसाठी आरडाओरड केली, ज्यामुळे आसपासच्या महिला कामगार आणि पुरुषांनी तिला मदत केली.
त्यांच्या मदतीने तिने कसेबसे चाकण पोलीस स्टेशन गाठले आणि आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी पोलिसांना सांगितली. सध्या पीडित महिलेवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तक्रार दाखल होताच तपास सुरू केला आणि अवघ्या २४ तासांत आरोपी प्रकाश भांगरेला अटक केली.
दरम्यान, आरोपी मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असून, सध्या मेदनकरवाडीत राहत होता. त्याने यापूर्वीही असे काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पुणे शहरात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.