पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! कात्रज डेअरीने वाढवल्या दुधाच्या किमती, जाणून घ्या…

पुणे : कात्रज डेअरीने दूधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली आहे.यामुळे पुणेकरांच्या घरखर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आता फुल क्रिम दूध ७४ रुपये आणि प्रमाणित दूध ६४ रुपये प्रति लिटर दराने विकले जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर महागाईचा नवा भार पडणार आहे.

तसेच दुधाच्या दरात झालेली ही वाढ १४ मे २०२५ पासून लागू झाली असून, पुणे जिल्हा दूध संघाने ही माहिती जाहीर केली आहे. कात्रज डेअरीने याआधी मार्च २०२४ मध्ये दुधाचे दर वाढवले होते आणि त्यानंतर वर्षभर दर स्थिर होते.
कात्रज डेअरीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दूध उत्पादनाचा खर्च वाढल्यामुळे दरवाढ करण्यात आली आहे. वाहतूक, चारा, आणि इतर खर्चामध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः उन्हाळ्यात दूध संकलन कमी झाले असताना दुग्धजन्य पदार्थांची मागणी मात्र वाढली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक दर देण्यासाठी ग्राहकांकडून थोडा अधिक दर वसूल करावा लागत आहे. या दरवाढीचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसणार असून, दररोज दूध घेणाऱ्या कुटुंबांच्या बजेटवर याचा परिणाम होणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ ग्राहकांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
दरम्यान, मे महिन्याच्या सुरुवातीलाच अमूल, गोकुळ आणि मदर डेअरी या दुध उत्पादक कंपन्यांनीही प्रति लिटर २ रुपयांची दरवाढ केली होती. त्यामुळे केवळ कात्रजच नव्हे तर इतर नामांकित दूध कंपन्यांच्याही दरात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.