मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर, कोल्हापूर न्यायालयाचा निर्णय..

कोल्हापूर : प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कोरटकरला याआधी पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपमानास्पद विधान केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला आहे. प्रशांत कोरटकरला २४ मार्चला तेलंगणातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात कोरटकर हा बरेच दिवस फरार होता. त्याचा कोल्हापूर पोलिसांकडून शोध सुरु होता. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरच्या नागपूर येथील घरी देखील धाड टाकली होती. पण कोरटकर फरार झाला होता.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर कोरटकरला एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे. याआधी त्याला अटक केल्यानंतर अगोदर तीन दिवस आणि नंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीने कोठडीत रवानगी केली होती.
कोरटकरने जामिनासाठी कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले होते. याबाबत दोन दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली होती. त्यानंतर आज न्यायालयाने या जामीन अर्जावरील निर्णय दिला आहे. सत्र न्यायालयाने कोरटकर याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.