पुण्यातील सिंबायोसिसमध्ये प्रवेशाचे आमिष, डोनेशन म्हणून 20 लाखांची मागणी, नेमकं प्रकरण काय?

पुणे : पुण्यातील नामांकित सिंबायोसिस कॉलेजमध्ये एमबीए प्रवेशासाठी खोटी जाहिरात तयार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रवेश करून देण्याचे तरुणांना आमिष दाखवत डोनेशन आणि फी च्या नावाखाली लाखो रुपयांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
या प्रकरणी आकाश यादव, कुणाल कुमार आणि दिव्या नामक तरुणीवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेजची खोटी जाहिरात तयार करून तरुणांना जाळ्यात ओढायचा प्रयत्न या तिघांनी केला. त्यासाठी आरोपींनी भव्य ऑफिसही थाटलं होतं. या संदर्भात महाविद्यालयाने पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
महाविद्यालयाच्या व्यवस्थापनातील एक जण यूट्युब बघत असताना त्यांना एका चॅनलवर सिंबायोसिस संस्थेचा लोगो असलेल्या इमारतीचा फोटो दिसला. त्यावर सिंबायोसिसमध्ये एमबीए प्रवेशासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश हवा असल्यास ज्यांचे बजेट आहे, त्यांनी दिलेल्या क्रमांकावर साधावा अशी जाहिरात दिसून आली.
याबाबत त्यांनी वरिष्ठांना सांगितली आणि तात्काळ डेक्कन पोलिसात तक्रार दिली. नंतर त्या जाहिरातीत दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता यातील एका आरोपीने त्यांना नोयडामध्ये असल्याचं सांगितलं. तुम्ही पुण्यातील बाणेर भागात असलेल्या ऑफिसवर जायला सांगितलं. त्या ऑफिसवर गेल्यावर सुरुवातीला 5 लाख रुपये आणि मूळ कागदपत्रे द्यावी लागतील, असे सांगितले.
सुरुवातीला पाच लाख रुपये द्यावे लागतील. त्यानंतर तुम्हाला महिन्याभरात सिंबायोसिसमधून मेल येईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रितसर प्रवेश फी भरुन प्रवेश घ्या असे सांगितले. त्यानंतर उर्वरित 15 लाख रुपये माझ्याकडे येऊन भरल्यानंतर तुमचे मूळ कागदपत्रे तुम्हाला परत मिळतील. असेही सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
याबाबत सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे संचालक डॉ. श्रीरंग आलटेकर यांनी आवाहन केले आहे की, आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आम्ही कुठल्याही यूट्युब किंवा सोशल मीडियावर जाहिरात करत नाहीत. महाविद्यालयाचे नाव वापरून ही फसवणूक केल्याचा प्रकार आम्ही पोलिसात कळवलं आहे. आमच्या प्रवेशाची प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे असते. असेही ते म्हणाले.