पीडितेचा आवाज शिवशाही बसच्या बाहेर खरच आला नाही? स्वारगेट बलात्कार प्रकरणी धक्कादायक माहिती उघड…

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस आगारातील शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणाने सगळं राज्य हादरले आहे. त्यानंतर पोलिसांनी जवळपास ७० तासानंतर आरोपी दत्ता गाडे याच्या मुसक्या आवळल्या.

तसेच पीडित तरुणीवर अत्याचार सुरू असताना तिने आरडाओरडा का केला नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. तर, दुसरीकडे पीडितेने आरडोओरड करण्याचा प्रयत्न केला होता. पण आवाज बाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली होती. आता या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे.
स्वारगेट एसटी बस आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये पहाटेच्या सुमारास २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर आता या खटल्यात त्याच्याविरोधात सबळ पुरावे जमवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तसेच या खटल्याच्या अनुषंगाने पोलिसांनी विविध मु्द्यांवर तपास सुरू केला आहे. या तपासाला शास्त्रीय, फॉरेन्सिक आधाराची जोड देण्यात येत आहे. तरुणीने अत्याचारावेळी आरडा ओरडा केला नाही का, तिचा आवाज बाहेर कोणाला ऐकू आला नाही का, असे प्रश्न उपस्थित झाले होते. त्याचा पोलिसांनी तपास केला आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी बसमधील आवाजाची चाचणी केली. पुणे पोलिसांनी तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये चाचणी केली आहे. या चाचणीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बसमधून मोठ्याने आवाज केल्यास तो बाहेर ऐकू जातो का, याची तपासणी यावेळी करण्यात आली. त्यावेळी वातानुकूलित बसच्या मोठ्या काचांमुळे बाहेर आवाज ऐकू आला नसल्याचे चाचणीत समोर आले आहे.