‘राष्ट्रवादी काँग्रेसचा’ राष्ट्रीय पक्षाचा दर्जा अडचणीत…!

नवी दिल्ली : राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी अटींची पूर्तता असते. या अटींमध्ये तीन राज्यांतील लोकसभा निवडणुकीत एका पक्षाने 2 टक्के जागा जिंकल्या पाहिजेत. लोकसभेच्या चार जागांच्या व्यतिरिक्त, एखाद्या पक्षाला लोकसभेतील किमान सहा टक्के किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये मिळालेल्या मतांपैकी किमान सहा टक्के मते मिळणे आवश्यक आहे.. या अटींची पूर्तता झाली तरच राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
याचआधारे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आला आहे. निवडणूक आयोग लवकरच राष्ट्रवादीच्या या स्थितीचा आढावा घेणार आहे. निवडणूक आयोग आज, मंगळवारीच पक्षाच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा भाग आहे.
यामध्ये चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी असते. या अटीच्या आधारे 2019 मध्ये NCP ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. आता गुजरातच्या निकालानंतर आम आदमी पक्षही हीच अट मान्य करेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.