दहावीचा गणिताचा पेपर फुटला! झेरॉक्स दुकानात उत्तरपत्रिकांची विक्री सुरू, कुठे घडला प्रकार?

Maharashtra SSC Paper leak : महाराष्ट्र राज्यात दहावीच्या बोर्ड परीक्षांसंदर्भात एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात पेपरफुटीच्या घटना समोर येत आहे. जालना आणि यवतमाळ जिल्ह्यात दहावीचे पेपर फुटल्याची बातमी आली होती. त्यानंतर मोठा गदरोळही झाला होता.

आता अमरावती जिल्ह्यात आज (ता.७) होणारा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. पोलिसांनी कारवाई करत झेरॉक्स दुकानातून गणिताच्या उत्तरपत्रिकांची झेरॉक्स काढताना काही लोकांना रंगेहात पकडले आहे.
जालना आणि यवतमाळ जिल्ह्यातील पेपरफुटीनंतर आता अमरावती जिल्ह्यातही हा प्रकार समोर आला आहे. आज दहावीच्या गणिताच्या परीक्षेचा पेपर असताना अमरावतीतील चांदूरबाजार भागातील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय परिसरात ही घटना घडली.

पोलिसांनी झेरॉक्स दुकानावर छापा टाकला असता, तिथे काही विद्यार्थी उत्तरपत्रिकांची झेरॉक्स काढून नेत असल्याचे आढळले. दहावीचा पेपर असल्याने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोलिसांनी गस्त वाढवली होती. त्याचदरम्यान जिजामाता शाळेसमोरील झेरॉक्स दुकानात काही मुले गणिताच्या उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी झेरॉक्स सेंटरमध्ये छापा टाकताच काही मुले पळून गेली, मात्र दुकानाच्या आत एक व्यक्ती झेरॉक्स मशिनवर पेपरची छपाई करताना आढळला. चौकशीत ही उत्तरपत्रिका दहावीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.