मुंडे राजीनामा देत नव्हते, मग फडणवीसांनी थेट ‘तो’ इशारा दिला, मग राजीनामा झाला, राजीनाम्याची इनसाईड स्टोरी आली समोर..

मुंबई : बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली. त्याच्यावर मकोका लावण्यात आला. या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ नये म्हणून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती.

सुरुवातीला धनंजय मुंडे हे राजीनामा देण्यास तयार नव्हते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रारंभीपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आग्रही होते. यापूर्वी त्यांनी अनेक वेळा अजित पवारांशी चर्चा केली होती. मुंडे यांनाही समजावून सांगितलं होतं. पण, धनंजय मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते.
नंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जर तुम्ही राजीनामा देणार नसाल, तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल, असा थेट इशारा दिला. नंतर वातावरण बदललं. रात्री बैठक घेऊन उद्याच राजीनामा द्या, असा इशाराच त्यांनी दिला होता. यामुळे आज त्यांनी राजीनामा दिला.

दरम्यान, देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे काही फोटो काल समोर आले. ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आज सकाळी मुंडेंनी राजीनामा दिला. या राजीनाम्याचा घटनाक्रम आता समोर आला आहे. याबाबत राज्यात आंदोलने करण्यात येत होती.
दरम्यान, संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. अपहरण करुन त्यांचे हाल हाल करण्यात आले. लोखंडी पाईप, क्लच वायरनं त्यांना बेदम मारलं गेलं. सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी देशमुख यांचा निर्दयीपणे जीव घेतला. या टोळीने केलेली मारहाण इतकी भीषण होती की देशमुख यांचं दीड लीटर रक्त साकळलं होत. त्यांना विवस्त्र करण्यात आलं, पाणी मागितलं तर त्यांच्या तोंडावर लघवी करण्यात आली होती.