‘किती ही क्रूरता? संतोष देशमुख यांच्या तोंडावर लघवी नाही तर महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या कारभारावर आहे..!!

बीड : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचे समोर आले. यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.

त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विधीमंडळ अधिवेशनात विरोधक आक्रमक झाले आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सर्वांनी मागणी केली होती. अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.
राजीनामा दिल्यानंतर करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. करुणा शर्मा म्हणाल्या की, मी एक फोटो बघितला की, संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांच्यावर तोंडावर लघवी करत आहे. या लोकांची काय मानसिक स्थिती आहे? हसत हसत संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचे फोटो, व्हिडिओ काढत आहेत. वाल्मिक कराड तो व्हिडिओ लाईव्ह बघत आहे. हे खूपच खळबळजनक आहे.

आपला महाराष्ट्र कुठे चालला आहे? त्यांनी जी लघवी केलेली आहे ती संतोष देशमुख यांच्या तोंडावर नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासनावर लघवी केलेली आहे. एका मृत व्यक्तीची अशी अवस्था हे लोक करू शकतात तर एका जिवंत व्यक्तीची हे लोक काय अवस्था करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची क्रौर्याची परिसिमा गाठणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आरोपी महेश केदारच्या फोनमधून जवळपास 15 व्हिडीओ आणि 8 फोटो जप्त करण्यात आलेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.