पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! रिंगरोडचे काम फेब्रुवारीत सुरू होणार, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 42 हजार कोटींचा प्रकल्प, जाणून घ्या…


पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बाहेरून जाणार्‍या रिंग रोडचे काम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे. हा एक महत्वाचा प्रकल्प असून यामुळे वाहतूक व्यवस्था नीट होईल.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे ४२ हजार कोटी रुपये खर्चून सहा लेनचा आणि १७० किलोमीटर लांबीचा रिंगरोड येत्या अडीच वर्षात म्हणजे जून २०२७ पर्यंत बांधण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत भूसंपादन देखील झाले आहे.

या रिंगरोडमध्ये नाशिक, नगर, सोलापूर आणि सातारा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने ये – जा करणारी जड वाहने शहराच्या बाहेरूनच जातील, यामुळे आतील गर्दी कमी होईल. कात्रज, देहूरोड महामार्ग शहरातील वाहनांसाठी उपयोगात येईल. तसेच मेट्रो आणि बीआरटी असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील सक्षम होईल. यामुळे याचा फायदा होईल.

या रोडच्या बारा निविदा मंजूर करून वर्कऑर्डर देण्यात आल्या आहेत. सर्व कामे एकाच वेळी सुरू करण्यात येतील. पश्चिमेकडील रस्त्याचे ९९%, तर पूर्वेकडील रस्त्याचे ८६ टक्के भूसंपादन झाले आहे. राहिलेले काम देखील लवकरच पूर्ण होईल.

रिंगरोडमध्ये पंधरा ठिकाणी डोंगराखालून बोगदे आहेत. तसेच खडकवासला धरणाचे जलाशय आणि महत्त्वाचे रस्ते येथून पुढे मार्गस्थ होण्यासाठी मोठे पूल उभारण्यात येणार आहेत. तसेच नियोजित पुरंदर विमानतळाच्या अलिकडून वाहने सोलापूर रस्त्याच्या दिशेने जातील. तेथून ग्रामीण भागातून नगर रस्त्यावर लोणीकंद येथे रिंगरोड जोडला जाईल.

त्यानंतर आऴंदीच्या पलिकडून रिंगरोड पिंपरी चिंचवड मनपाजवळ नाशिक रस्त्यापाशी पोहोचेल. रिंग रोडचे दोन भाग केले असून, पश्चिमेकडील रस्ता ६९ किलोमीटरचा, तर पूर्वेकडील रस्ता १०१ किलोमीटरचा आहे. यामध्ये सहा लेनचा मुख्य रिंगरोड, तसेच सेवा रस्ते बांधण्यात येणार आहेत. अशी माहिती, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!