हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली येत दोन तरुणींचा मृत्यू…

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. अशातच हिंजवडीत झालेल्या एका घटनेमध्ये दोन विद्यार्थीनींचा हकनाक बळी गेल्याची संतापजनक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडीत भरधाव वेगात निघालेला रेडिमिक्स डंपर वळणावर आला आणि वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटले. यामुळे रेडिमिक्स डंपर पलटी झाला, पण दुर्दैवाने त्याचवेळी रेडिमिक्स डंपरखाली शेजारून जात असलेली दुचाकी दबली गेली, दुचाकीवरील दोन विद्यार्थिनींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
क्रेनच्या साह्यानं रेडिमिक्स डंपर हटविण्यात आला. चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून विद्यार्थिनींची ओळख पटवण्यात आली आहे. या दोघींही पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रांजली महेश यादव (वय. २२ रा. गोदरेज प्रॉपर्टीज्, म्हाळुंगे; मूळ रा. टेंभुर्णी, ता. माढा) आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे (वय. २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज्, म्हाळुंगे; मूळ रा. शेगाव, अमरावती) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत.
या दोघी एमआयटी कॉलेजध्ये अभियांत्रिकेच्या शेवटच्या वर्षात शिकत होत्या. काल (शुक्रवारी) सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या. वडजाईनगर कॉर्नरजवळ भरधाव आलेल्या डंपरचालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्यानं डंपर पलटी झाला. प्रांजली आणि आश्लेषा या डंपरखाली सापडल्या गेल्या. तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेण्यात आला.
दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे, तर शिकण्यासाठी घरापासून लांब असलेल्या आपल्या मुलींचा असा दुर्दैवी अंत झाल्याची घटना त्यांच्या कुटूंबाला समजताच त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.