अनेक रुग्णांना वरदान ठरलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची मदत प्रक्रिया होणार पेपरलेस, स्वतंत्र ऑनलाइन प्रक्रिया विकसित होणार…

मुंबई : आपल्या राज्यातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता कार्यान्वित मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला जातो. अनेकांना याचा लाभ होतो. यामुळे अनेकांना उपचार घेता येतात. आता यामध्ये काही बदल करण्यात आला आहे.

आता हा कक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सुलभ व पेपरलेस होत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता लागणार नाही.
याकरिता लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. यामध्ये आता सद्याच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा एओ क्रमांक आणि एम क्रमांक एकत्र करण्यात येणार आहे.

या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक गतिशिल, सोपी होणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने आतापर्यंत राज्यातील हजारो गरजू रुग्णांना जीवनदान दिले आहे. दुर्धर आणि महागड्या आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक साहाय्य मिळाल्याने अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे.

तसेच आता जिल्हाधिकारी कार्यालयातही मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरु करण्यात येणार असून याबाबत शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरीकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. यामुळे अनेकांचा वेळ वाचणार आहे.