एसटीची दरवाढ आजपासून तर रिक्षा-टॅक्सी प्रवासही महागला, सर्वसामान्यांच्या खिशाला किती रुपयांचा फटका?, जाणून घ्या..

मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईतील प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता एसटी बस आणि खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासूनच प्रलंबित असलेल्या दरवाढीला मंजुरी मिळाली आहे.

एसटी महामंडळाचा १५% भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केलाय. शनिवारी २५ जानेवारी मध्यरात्रीपासून एसटीच्या भाडेवाढ लागू होणार आहे. गेली ३ वर्षे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे दरवर्षी ५ टक्के प्रमाणे तीन वर्षांची १५ टक्के एसटी महामंडळानं केलीय. भाडेवाढ झाल्यामुळे राज्यातील जनतेसाठी एस.टी.चा प्रवास ६० ते ८० रुपयांनी महागणार आहे.
दरम्यान, एसटीपाठोपाठ रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे. नवीन वर्षात ऑटो रिक्षा, टॅक्सीच्या भाडेवाढीमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागली आहे. टॅक्सीचा दर ४ प्रति किमीने तर रिक्षाचा दर ३ प्रति किमीने वाढणार आहे. त्याचप्रमाणे टॅक्सीचा दर हा २८ वरुन ३२ वर जाणार आहे, तर रिक्षाचा दर हा २३ वरुन २६ वर जाईल.

दरम्यान, राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागांना १०० दिवसांचे नियोजन करून सादरीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एसटी महामंडळाने काही सूचना केल्या होत्या.

यात स्वमालकीच्या ५ हजार नव्या बस खरेदी करणे, पहिल्या चार महिन्यात २० चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करणे आणि तिकीट दरात १४.९५ टक्के भाडेवाढ करणे अशा प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. त्यानुसार आता प्रस्तावित भाडेवाढ करण्याबाबत निर्णय झाला आहे.