संतोष देशमुखांनंतर धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, आणखी एक प्रकरण आले अंगलट, नेमकं काय घडलं?

मुंबई : सध्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना फवारणी पंपाच्या खरेदीत घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला स्पष्टीकरण मागितलंय. यासंदर्भात राजेंद्र मात्रे यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.

धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना २६०० रुपयांचा कृषीपंप ३६५० रुपयाला खरेदी केलं होतं, असा आरोप करण्यात आला आहे. कृषी सचिवांना नकार देऊनही तत्कालीन कृषिमंत्र्यांनी फवारणी पंपाचा अतिरिक्त दराने खरेदी केला, अशी माहिती समोर आली. जनहित याचिकेत मंत्री धनंजय मुंडे पक्षकार केलं नसल्याची माहिती वकील शंतनू घाटे यांनी दिली आहे.
कृषी विभागाने ५ डिसेंबर २०१६ रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केली होती. मात्र २०२३ मध्ये धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असताना यात बदल झाला. २०२३ मध्ये राज्य सरकारने कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल का केला? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे.

दरम्यान, २३ ऑक्टोबर २०२३ रोजी तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी डीबीटी योजना बंद केली आणि सरकारकडून कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला. बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत कृषी साहित्य विकत घेण्याची संधी असताना शासनाने जास्तीची किंमत मोजत कृषी साहित्य खरेदी केल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे.
