Daund : रमेश थोरातांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांचा विरोध, दौंडमध्ये हजारो कार्यकर्ते शरद पवारांना देणार पत्र…

Daund : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत.

अशातच आता दौंडमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी, माजी आमदार रमेश थोरात हे आगामी विधानसभेसाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुतारी या चिन्हावर निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात मोठी खळबळ उडाली आहे.
मात्र शरद पवार गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी थोरात यांना पक्षाची उमेदवारीला तीव्र विरोध दर्शवला आहे. तालुक्यातील अनेक कार्यकर्ते शरद पवार यांना याबाबत पत्र व्यवहार करण्याच्या तयारीत आहेत. सध्या तसे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांची राज्यपातळीवर अद्याप जागावाटपाची चर्चा सुरू आहे.

कोणत्याही विधानसभा मतदारसंघात कोणाला किती जागा मिळणार हे अद्याप निश्चित झाले नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात मात्र विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आणि जागावाटप होण्यापूर्वीच विधानसभा निवडणुकीचे एकप्रकारे बिगुल वाजले असुन राजकीय वातावरण तापले असल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दौंड मधून महायुतीत भाजप आमदार राहुल कुल यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे.
दौंडमध्ये एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे लोकसभेत एकमेकांना पेढा भरून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा एकत्र प्रचार करताना मतदारांनी पाहिले आहे. मांडीला मांडीला लावून एकाच व्यासपीठावर गप्पा मारताना पाहिले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत रमेश थोरात हे आमदार कुलांचा प्रचार करतील अशी चर्चा महायुतीत होती. Daund
मात्र रमेश थोरात यांनीही आगामी विधानसभेसाठी जोरदार तयारी केली आहे. आणि तेही महाविकास आघाडीच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तसे थोरात यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे महायुतीला तर हादरा बसलाच, पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातही खळबळ उडाली असून शरद पवार यांच्या पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवार मात्र अस्वस्थ झाले आहेत.
रमेश थोरातांमुळे त्यांची उमेदवारी अडचणी सापडली आहे. त्यामुळे आता दौंडमध्ये शरद पवार गटात निष्ठवंतांनाच उमेदवारी मिळावी असा सूर निघू लागला आहे. त्यासाठी तालुक्यातील हजारो निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना पत्रव्यवहार करण्याच्या तयारीत आहेत.
रमेश थोरात यांनी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात काम केले आहे. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे.त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.
पक्षासाठी निष्ठावंत असलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला आगामी विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी या पत्राद्वारे करू लागले आहेत. त्यामुळे दौंडला आगामी विधानसभेसाठी शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.