Sortapwadi : सोरतापवाडी येथील वैभव भोगलची कौतुकास्पद कामगिरी! शेतकऱ्याच्या मुलाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालून नाव कमवलं…

Sortapwadi : सोरतापवाडी (ता. हवेली) येथील शेतकऱ्याच्या मुलाने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत आपल्या आई, वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे. संघर्ष, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या सर्वांच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे.

वैभव (माऊली) बाळु भोगल (रा. सोरतापवाडी, ता. हवेली, मूळ गाव बोरगाव, ता. करमाळा, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने महागडे क्लासेस न करता घरी अन् मित्रांसोबत राहून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले आहे. सोरतापवाडी येथे त्याचे आई, वडील हे कामानिमित्त आले होते. दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी केली.
मोठ्या कष्टाने त्यांनी मुलाला शिवकल आहे. वैभवचे प्राथमिक शिक्षण सोरतापवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे, तसेच 5 वी ते 10 वीचे शिक्षण नायगाव येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयात झाले. त्याने जेएसपीएम या कॉलेजमध्ये मॅकेनिकल्स इंजिनिअरची पदवी घेतली.

काही दिवस त्याने नोकरी देखील केली. त्याला पोलीस अधिकारी होण्याचे वेध लागले. त्यामुळे ते काम काही महिन्यातच सोडून दिले. घरची परिस्थिती बेताची पण अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्याने 2018 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. कोणतीही शिकवणी न लावता भावाच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरु ठेवला. Sortapwadi
शैक्षणिक प्रवासात वैभवने अनेक कष्ट घेतले. तो न डगमगता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिला. या काळात त्याच्यातील हरहुन्नरीपणा, जिद्द व चिकाटी बघून आई-वडिलांनी व त्याच्या मोठ्या भावाने आवश्यक ते सर्व मार्गदर्शन केले.
याबाबत तो म्हणाला, मला लहानपणापासून पोलिस वर्दीची आवड अन् आकर्षण होते. घराच्या परिस्थितीमुळे इंजिनिअर झालो. पण मन रमले नाही. माझ्या यशात आई – वडिलांचा व मोठ्या भावाचा खूप मोठा वाटा आहे. आर्थिक परिस्थिती बघून मी कोणताही क्लास लावलेला नाही स्वतः अभ्यास केला, असे त्याने सांगितले आहे.