Indapur News : दहावीच्या विद्यार्थ्याचा ह्दयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू, घटनेने इंदापुरमध्ये हळहळ…

Indapur News : इंदापूर येथील श्री.नारायणदास रामदास हायस्कूल येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेतच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (ता. १) दुपारी घडली आहे.

प्रथमेश विकास खबाले (वय. १६ वर्षे, रा.भाटनिमगाव,ता.इंदापूर) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, प्रथमेश विकास खबाले हा श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. तो दुपारी शाळेत आल्यानंतर दररोजच्या प्रमाणे शाळेच्या प्रांगणात सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर वर्गात गेला.

त्यानंतर बाकावर बसल्यानंतर त्याला चक्कर आली. शिक्षक तिकडे धावले, तो विद्यार्थी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहून शिक्षकांनी त्याच्या हृदयावर पंपिंग केले, त्यानंतर त्यांनी तात्काळ त्यास इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. Indapur News
मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. घटनेनंतर दुपारी शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. दरम्यान शिक्षकांना अश्रू अनावर झाले.
भाटनिमगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच अर्चना अजित खबाले यांचा तो पुतण्या होता. दरम्यान ही दुःखद घटना कळताच गावात शोककळा पसरली. विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या हृदयद्रावक घटनेने तालुक्यातील सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे