Pune Rains : पुणेकरांनो काळजी घ्या! धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचे थैमान, खडकवासलातून विसर्ग वाढवला, भिडे पूलही पाण्याखाली…

Pune Rains : गेल्या आठवड्याभरापासून राज्यामध्ये सर्वत्र ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. यात टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरण साखळीत ८५.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

त्यामुळे खडकवासला धरणातून तब्बल २२ हजार ८८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग आणखी वाढल्यास पुन्हा घरात पाणी शिरेल, या भीतीने नदीकाठी राहणाऱ्या पुणेकरांची धडधड वाढली आहे.
चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैअखेर दमदार पाऊस होत असल्याने शहराला पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. मात्र दमदार पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. Pune Rains

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे हा परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. जुलैच्या मध्यानंतर दमदार पाऊस बरसला आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली. खडकवासला धरण साखळीतही पावसाने थैमान घातले आहे.
दरम्यान, रविवारी पानशेत धरणातून पहिल्यांदाच ४,७१२ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. तर, धरणांच्या परिसरात संततधार कायम असल्याने रविवारी खडकवासलामधून पुन्हा विसर्ग सोडण्यात आला.