इंदापूरकरांना दादांचा दिलासा ! खडकवासला व निरा कालव्याच्या आवर्तनास कृषी पंपांना आठ तास सलग वीजपुरवठा !


पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत आमदार दत्तात्रय भरणे यांनी विविध मागण्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केल्या आहेत. इंदापूर तालुक्याला आवश्यक असलेल्या खडकवासला व निरा डावा कालव्याचे पिण्यासाठी, शेती सिंचनासाठी तसेच तलाव भरण्यासाठी पाणी सोडावे तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना आठ तास वीज द्यावी. अशी आग्रही मागणी पालकमंत्री अजित पवार यांनी मान्य केली आहे.

आ.दत्तात्रय भरणे यांची मागणी विचारात घेऊन पालकमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही कालव्यांना रविवार 21 जुलै पासून पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकयांच्या शेती पंपांना आठ तास वीज देण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आज दिल्या आहेत.

आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या या मागणीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांना व नव्याने लागण केलेल्या ऊस पिकांनाही याचा फायदा होणार आहे, तसेच या दोन्ही कालव्याच्या लाभ क्षेत्रात असणाऱ्या गावोगावच्या पाणीपुरवठा योजनांना भूमिगत जलस्त्रोत बळकट होऊन पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर खडकवासला व नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व तलाव भरले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा आगामी काळातील शेती सिंचनाचा प्रश्न देखील मिटवण्यासाठी मदत होणार आहे.