Mumbai : बोट असलेले आईस्क्रिम ज्याने खाल्लं त्याला धोका? बोटाबाबत मोठा रिपोर्ट आला समोर…

Mumbai : मुंबईच्या मालाडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. याठिकाणी आईस्क्रिममध्ये माणसाचं कापलेलं बोट सापडल्याने एकच खळबळ उडाली. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रिममध्ये हे बोट सापडले.

याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात ते बोट आईस्क्रीम कंपनीच्या कर्मचाऱ्याचं असल्याचे समजले. आता या बोटाबाबतचा मोठा रिपोर्ट समोर आला आहे.
मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने काल रात्री झेप्टो ॲपद्वारे यम्मो कंपनीच्या 3 आईस्क्रीम ऑर्डर केली होती. या कुटुंबातील एका महिलेनं बटरस्कॉच आईस्क्रीम खाल्लं तेव्हा तिला त्याच्या तोंडात मांसाच्या तुकड्यासारखे काहीतरी वाटले .

महिलेने अर्ध्याहून अधिक आईस्क्रीम खाल्ले होते. जेव्हा तिनं आइस्क्रीमकडे पाहिलं तेव्हा तिला त्यात मानवी बोट दिसलं. सुमारे २ सेमी लांबीचा मानवी बोटाचा तुकडा हे पाहून महिलेला धक्का बसला.
महिलेनं तत्काळ आईस्क्रीम कंपनी yummo.icecream या इन्स्टाग्रामवरील पेजवर तक्रार नोंदवली आणि कंपनीच्या कस्टमर केअरलाही माहिती दिली. आईस्क्रीममध्ये एक खिळाही सापडला. महिलेनं याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
मालाड पोलिसांनी लगेचच आईस्क्रीम जप्त केली. मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध आयपीसी 272,273,336 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील हडपसर परिसरात छापा टाकण्यात आला. v
मुंबई पोलिसांना पुणे फॅक्ट्रीमध्ये एक व्यक्ती जखमी असल्याची सापडली. या व्यक्तीच्या हाताला जखम झाली आहे. आईस्क्रिममधील ते बोट याच व्यक्तीचं असल्याचा संशय पोलिसांना आला. पुण्याच्या इंदापूर फॉर्च्युन डेअरीमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्याचं नाव ओमकार पोटे आहे. हा २४ वर्षांचा युवक आहे.
ओमकार पोटे पुण्याच्या फॉर्च्युन डेअरीमध्ये एप्रिल २०२४ पासून असिस्टंट पॅकिंग मॅनेजर म्हणून जॉईन झाला होता. इंदापूरच्या फॉर्च्युन डेअरीमध्ये ११ मे २०२४ च्या सकाळी ओमकार पोटे पॅकिंग विभागात आईस्क्रीमचं पॅकिंग करत होता त्याचवेळी त्याच्या बोटाचा वरचा भाग तुटला. ओमकार पोटेचं बोट तुटल्यानंतर कंपनीने त्याच्यावर उपचारही केले, पण तुटलेल्या बोटाचा शोध घेतला नाही.
पोलिसांनी व्यक्तीचे डीएनए आणि वैद्यकीय तपासणी केली. त्याचे ब्लड सॅम्पल सांताक्रुज फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवले. आईस्क्रीममध्ये कापलेल्या बोटाचा भाग मिळाला होता, तोही फॉरेन्सिक तपासासाठी पोलिसांनी पाठवला. आता त्या कर्मचाऱ्याचा ब्लड सॅम्पलचा रिपोर्ट समोर आला आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या मते, आईस्क्रिममध्ये मिळालेल्या बोटात रक्त नव्हतं. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या ब्लड सॅम्पलशी ते जुळवता आलं नाही. आता पोलिसांना डीएनए रिपोर्टची प्रतीक्षा आहे. यातून ते बोट फॅक्ट्रीतील त्या कर्मचाऱ्याचे आहे की नाही हे स्पष्ट होईल.