Pune Ring Road : पुणे रिंग रोडच्या भूसंपादनाला ब्रेक, नेमकं कारण काय? जाणून घ्या….

Pune Ring Road : सध्या देशामध्ये आणि राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून त्यानुसार देशात व राज्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीची महत्त्वाची कामे देण्यात आलेली आहेत.
पुणे रिंग रोडच्या भूसंपादनाला ब्रेक..
त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून म्हणजेच एमएसआरडीसी कडून सुरु करण्यात आलेल्या रिंग रोड रस्त्याच्या भूसंपादनाला आता वेळ होणार असल्याचे निश्चित झाल्याने आचारसंहिता संपण्याची वाट आता पहावी लागणार आहे. पुणे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर या जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघाचे दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
त्यामुळे सर्व महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुकीच्या कामकाजाच्या जबाबदारी देण्यात आल्यामुळे याचा परिणाम पुणे रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेवर होणार आहे.
इतकेच नाहीतर तालुका पातळीवरील तहसीलदारापासून ते केंद्रप्रमुख व इतर कर्मचाऱ्यांना निवडणुकांच्या संबंधित कामे देण्यात आल्यामुळे ते कामांमध्ये व्यस्त आहेत. Pune Ring Road
लोकसभा निवडणुकीची आचारसहिता ही ६ जून पर्यंत असल्याने तोपर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासकीय दृष्टीने केवळ निवडणुकीच्याच कामामध्ये लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे व त्या पद्धतीचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पुणे रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेतील कामांना विलंब लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.