Pune Crime : दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! पतीकडून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून..

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

अशातच आता पुण्याच्या कात्रज परिसराजवळील दत्तनगरमध्ये दुहेरी खूनाचा प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक कलहातून पतीने पत्नी आणि मुलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
श्वेता तळेवाले (वय. ४०), शिरोली तळेवाले (वय.१६) अशी खून झालेल्या आई आणि मुलीची नावे आहे तर अजय तळेवाले (वय.४५) असे खून करणार्याचे नाव आहे.

ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, खून करणारा स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, गेल्या काही दिवसांपासून श्वेता आणि अजय यांच्यात वेळावेळी भांडण-तंटा होत होता. आर्थिक वादातून त्यांच्यामध्ये भांडणे व्हायची. शुक्रवारी रात्री देखील पती-पत्नीमध्ये वाद झाले. Pune Crime
पत्नी रागात म्हणाली, मी माहेरी निघून जाईल. त्यानंतर त्या रागाच्या भरात झोपल्या. त्यानंतर पतीने झोपलेल्या पत्नीची हाताची नस कापली आणि त्यानंतर उशीने तोंड दाबून तिचा खून केला. नेहमी आईची बाजु घेणार्या मुलीचा देखील अजयने तिच्या तोंडावर उशी दाबून खून केला आहे.
दरम्यान, अजय तळेवाले हे फायनान्सची कामे करतो. ग्राहकांना कर्ज मिळवून देण्याचे तो काम करतो असे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा या घटनेमुळे पुणे हादरले आहे.