हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथे नर्सरीतून गावठी दारू विक्री; सोरतापवाडी, शिंदवण्यातून ९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल..

उरुळी कांचन : पुणे जिल्हात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच आहे. अशातच हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील चक्क रोपांच्या नर्सरीत हातभट्टीची गावठी तयार दारू विक्री करणाऱ्या व जागेच्या मालकावर अशा दोघांवर उरुळी कांचन पोलिसांनी धडक कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

हि कारवाई सोमवारी (ता. २६) केली आहे. तसेच सोरतापवाडी, शिंदवणे परिसरातहि कारवाई करण्यात आलेली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही ठिकाणावरून तब्बल ८ लाख ८७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली आहे.
राजेंद्र चौधरी आणि जागामालक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ठिकाणावरून ३५० लिटर कच्चे रसायन, ९ हजार १५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा ६ लाख ४५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच सोरतापवाडी, शिंदवणे परिसरातील गावठी हातभटट्टीची २ लाख ४२ हजार रुपयांची ५२५ लिटर तयार दारू पोलिसांनी नष्ट केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कयादु राठोड या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोरतापवाडी परिसरात मोठया प्रमाणात गावठी हातभटट्रीची दारू तयार करून त्याची विक्री करत असल्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचारी सदर ठिकाणी दाखल झाले असता सोरतापवाडी, शिंदवणे परिसरात गावचे हददीत कॅनॉलच्या कडेला गावठी हातभटट्टीची तयार दारू करण्यासाठी भटट्टी चालु असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता ५ हजार लिटर कच्चे व जळके रसायन तसेच गावठी हातभटट्टीची २ लाख ४२ हजार ५५० रुपयांची ५२५ लिटर तयार दारू जप्त करण्यात आली आहे. यावेळी दारू तयार करणारी महिला कयादु राठोड हि पोलिसांची चाहूल लागताच पळून गेली आहे. याबाबत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कोरगांव मुळ ग्रामपंचायत हद्दीत राजेंद्र चौधरी यांचे नर्सरीमध्ये गावठी हातभटट्रीची तयार दारूचा साठा मोठ्या प्रमाणात जवळ बाळगून ओळखीच्या लोकांना विक्री करताना आढळून आल्याने पोलिसांनी राजेंद्र चौधरी याच्यावर विक्री प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर जमीन मालक याच्यावरहि उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधिर पाडुळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नवले, पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड, रणजित निकम, सचिन जगताप, मनिषा कुतवळ, पोलीस नाईक प्रमोद गायकवाड यांचे पथकाने केलेली आहे.